Monday, October 4, 2010

मी त्या माणसाच्या शोधात आहे!



माणसाचं मोठेपण कशात असते? त्याने स्वीकारलेला तत्त्वाप्रती असलेल्या प्रामाणिक निष्ठेत? की त्याने केलेल्या तडजोडीत? मुळात हे प्रश्न तेव्हाच पुढे येतात, जेव्हा एखादा माणूस आपली एखाद्या तत्त्वाप्रती आपली बांधिलकी जाहीर करतो. ज्यांचे या बांधिलकीशी काहीही देणे घेणे नसते त्यांच्या संदर्भात असले प्रश्न उभे होत नाहीत. जे लोक बांधिलकीशी आपले नाते सांगतात त्यांना या प्रश्नांना टाळून पुढे जाताच येत नाही. पद, पैसा आणि पुरस्कार याने माणूस मोठा होत नाही. हे वास्तव प्रज्ञावत माणूस जाणतो म्हणूनच तो यापेक्षा आपल्या निष्ठेला अधिक महत्त्व देतो नुकतेच आंबेडकरी अर्थतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला आणि ह्या सगळ्या प्रश्नांना रान मोकळे झाले.
मुळात ज्या समाजवास्तवात डॉ मुणगेकरांनी स्वताला उभारले त्या समाजवास्तवात ज्या परिवर्तनाच्या चळवळी झाल्यात त्यातल्या निष्टावंत गणल्या जाणाऱ्यां एका चळवळीचे डॉ . मुणगेकर सक्रीय कार्यकर्ते होते. ही चळवळ कॉंग्रेस विरोधी होती. त्याही पुढे जावून आंबेडकरी अर्थतज्ञ म्हणून ज्याची संबंध जगभर ख्याती आहे त्याना केवळ आपले राज्यसभा सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसला आपल्या विश्वासाचा दाखला देण्यासाठी पक्ष प्रवेशासारखा निर्णय घ्यावा लागला. हा कॉंग्रेसने त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास असेलही कदाचित पण यासाठी त्याना त्यांच्या वैचारिक निष्ठेचे बलिदान देण्याची का गरज वाटावी? हाच प्रश्न पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याना पडला आहे.
ज्या सामाजिक परिप्रेक्षात वैचारिक क्षेत्र, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रापेक्षा श्रेष्ठ समजले जाते. तिथे वैचारिक क्षेत्रातली मंडळी राजकीय क्षेत्रालाच प्राधान्य द्यायला लागली तर त्यातून दोन प्रश्न निर्माण होतात. एक: ज्या वैचारिक क्षेत्रात या मंडळींचा वावर आहे त्या क्षेत्राची मौलिकता संपुष्टात आली आहे काय? आणि दुसरे असे की, या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांच्या निष्टा प्रामाणिक नाहीत काय? आज किमान या प्रश्नानाची उत्तरे समाजाला शोधावीच लागेल कारण मुणगेकर हे एकटे नाहीत यापूर्वीही असे प्रकार घडले नाहीत असे नाही. थोड्याफार फरकाने अशा घटना वैचारिक क्षेत्रातील मंडळींच्या संदर्भात घडल्या आहेत. मुणगेकर यांच्यामुळे ही घटना उजेडात आली एवढेच!
ज्यावेळी डॉ. मुणगेकर याना राष्ट्रपती नामनिर्देशित संसद सदस्यत्व बहाल कण्यात आले त्या वेळी कॉग्रेसने दाखवलेली तटस्थता आणि स्पष्टता किती तकलादू होती. हे आता अगदी थोड्याच अवधीत सिद्ध झाले आहे. पदाने अथवा पैशाने माणसे वाकवण्याची त्यांची जुनीच नीती आताही त्याच पद्धतीने सुरुच आहे. निष्ठावंत प्रतिष्ठीत माणसाना आमिषे द्यायची . आमिषांना बळी पडलेली माणस आपल्या माणसांपासून तोडायची आणि हतबल करून सोडून द्यायची. मग त्यांचा रुपवते होतो, भंडारे होतो, आठवले होतो, ही यादी आणखी वाढवता येईंल. कोणीही सर्वज्ञ नसते. पण मुणगेकारांच्या संदर्भात हे इतक्या सहज घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
जे घडले त्याचे काय बरे - वाईट परिणाम होईल ते काळच ठरवेल. फक्त या सबंध प्रकरणात एकच दु;खाची बाब आहे ती म्हणजे आंबेडकरी माणसांच्या संदर्भात जे गृहीत धरले जाते त्याला या प्रकरणामुळे पुष्टी मिळाली. कोणी कुठे जावे हा ज्याचा त्यांचा विचार असला तरी तो ज्या समाजच प्रतिनिधित्व करीत असतो. तो समाज त्यामुळे पुढे येतो आणि त्या समाजाचा त्या समाजातील माणसांचा कुठलाही दोष नसताना बदनाम होतो. त्या समाजाला बदनाम करण्याचा ठेका तुंम्हाला कोणी दिला? माणस मोठीच असतात, पण आसक्तीची बाधा होताच
वाकून जातात नव्हे सरपटायला लागतात. जे याच्या पलीकडे जातात त्यांच्या मोठेपनासमोर आकाशालाही वाकावे लागते. अशी आकाशाला वाकवणारी माणस ज्या समाजाकडे असतात तो समाज आकाशापेक्षाही मोठा होतो. मी त्या माणसाच्या शोधात आहे!

Wednesday, September 29, 2010

शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!





सकाळ वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक आणि जेष्ठ्य आंबेडकरी लेखक उत्तम कांबळे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही ऐतिहासिक घटना मराठी सारस्वतांच्या प्रांतात घडली. याचा आनद तमाम पुरोगामी माणसाला झाला असला तरी ज्या पायावर मराठी सारस्वतांचा सगळा डोलारा उभा आहे तों पाया बदलल्याशिवाय किंवा नवी पायाभरणी झाल्याशिवाय नव्या सांस्कृतिक संवादाला आरंभ होणार नाही.
मुळात निवडणुकीच्या माध्यमातून या सर्वोच्च सांस्कृतिक पदावर आरूढ होता येते. हा एका प्रक्रियेचा भाग आहे. ही प्रक्रिया निश्चितच वादातीत नाही. या वादाला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. परंतु कोताही पर्याय अजून पुढे आला नाही. लोकशाहीत ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया मानली जाते. बहुमताच्या आधारावर ठरणारा निर्णय लोकशाहीत सर्वांनाच मान्य करावा लागतो. याचा अनेकांना फटका बसला पानतावणे सरांना या प्रक्रियेत यशस्वी होता आले नाही. कारणांचा गुंतावळा बाजूला सारून आपण आता हेच म्हणू शकतो की पानतावणे सराना ही प्रक्रिया मानवली नाही आणि ज्याना ती मानवणार नाही हे काळात होते ते या वाटेलाच गेले नाही विंदा,बाबुराव बागुल, रावसाहेब कसबे आदी काही सन्माननीय नवे आहेत. उत्तमराव या वाटेने गेले आणि यशस्वी झाले. केवळ यशस्वी झाले नाही तर दणदणीत विजयी झाले. भल्याभल्यांनी तोंडात बोटे टाकावी अशी ही घटना आहे.
पदामुळे माणूस मोठा होतो की, माणसांमुळे पदाची प्रतिष्ठा वाढते? हे सगळे प्रश्न उत्तमरावांच्या संदर्भात गैरलागू आहेत. ज्या विचारावर त्यांची निष्ठा तो विचार हे पद आणि प्रतिष्ठा यापेक्षा कितीतरी मोठा आहे. तो त्यांनी जपला म्हणूनच अत्यंत तळातल्या माणसांपासून तर शिखरावरच्या प्रतिष्ठित माणसांपर्यंत अगदी मनापासून प्रेम करणारी मंडळी त्यांच्या भोवती निस्वार्थपणे उभी आहेत. हे संबंध समाज जाणतो. मुळात प्रश्न आहे तो उत्तमरावानी निवडलेला हा मार्ग त्यांच्या विचाराचा वाहक ठरेल काय? याचे उत्तर आज जरी नेमकेपणाने देता येत नसले तरी उद्या मात्र या प्रश्नाचे उत्तर आपल्याला निश्चित पणाने द्यावे लागणार आहे.
अगदी शून्यातून उत्तमरावानी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. वृत्तपत्र विकणाऱ्या पोरापासून तर सकाळच्या न्यूज नेटवर्क संपादक पर्यंतचा पत्रकारितेतला हा शिखरपर्यन्त्चा आणि एक मराठी लेखक म्हणून अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पद हा सर्वोच्च शिखरापर्यंतचा प्रवास पार करताना त्यांनी आपल्या विचाराशी कुठलीही तडजोड केली असेल असे आज तरी वाटत नाही. अगदी सांगलीचे स्वागताध्यक्षपद भूषवताना आणि आर आर आबा सारखा जवळचा स्नेही जपताना त्यांच्या वैचारिक निष्ठेला कधीच तडा गेला नाही. याउलट राजकीय पदांसाठी आंबेडकरी विचारवंतांचे झालेले कान्ग्रेसीकरण आणि स्वताला आंबेडकरी नेते म्हणवणाऱ्या माणसांनी सत्तेसाठी केलेले अभद्र लांगुलचालन हे आपण जेव्हा पाहतो त्या तुलनेत उत्तमरावानी जपलेली वैचारिक निष्ठा ही कितीतरी पटीने अधिक मोलाची आहे.
बदलत्या समाज वास्तवात बदलणारा माणूस आणि नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी स्वताला आणि समाजाला बदलाविणारा माणूस ही दोन्ही मानस प्रतिष्ठित असली तरी, बदलत्या समाज वास्तवात बदलणाऱ्या मान्सानापेक्षा नव्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी समाजाला बदलणारया माणसाची अधिक गरज समाजाला आहे. उत्तम कांबळे या नावाकडून ही अपेक्षा करणे गैर नाही. आज त्यांच्या रूपाने या प्रतिगामी शिखराचा चेहरा बदलला; पायव्याला आता बदलावेच लागेल!

Monday, August 16, 2010

कवितेच्या काळजातला पीळ निसटला....


आज वर्गात तास सुरु असताना सुर्वे गेल्याची दु:खद बातमी समजली आणि ; एक नि:शब्द स्तब्धता वर्गात पसरली, अगदी " नेहरू गेले त्या दिवसा सारखी " सगळेच चेहरे अगदी कोरे , भाव हरवलेले फक्त " सुर्वे गेले " एवढेच शब्द वर्गात घुमत राहिले,मराठी कवितेच्या काळजतला हा तळातल्यांच्या वेदनेचा पीळ असा अचानक निसटून गेला मराठी कवितेची सतत सलणारी , माणसाला त्याच्या दु:खाची जाणीव करून देणारी सल आता कायमची काळाच्या आणि या पोकळीच्या पल्याड निघून गेली ।

सुर्वे कवी होते त्याहीपेक्षा ते परिपूर्ण माणूस होते। एक अत्यंत संवेदनशील तेवढेच विनयशील असणारे सुर्वे त्यांच्या वाट्याला आलेल्या आयुष्याबाबत कुठलीही तक्रार न करता जगले। थोड़े थोडके नव्हे तर ८४ वर्षे ते जगले नातूच नव्हे तर पंतुनच्याही वाट्याला ते आले। मराठी माणूसच त्यांच्या कवितेचा चाहता नव्हता जगातल्या सगळ्या भाषेतल्या काव्य रसिकाना त्यांच्या कवितेने वेड लावले होते । माणसांबद्दल बोलणारे , माणसांमध्ये रमणारे, सतत माणसांचाच विचार करणारे सुर्वे कवितेच्या कुळाला नव्या मानव्याची कुस बहाल करू इच्छित होते । मूलत: कवी हा सामाजिक संपत्ति असतो। तो जे देतो ते इतराना देता येत नाही । तो संवेदना घेतो आणि मानुषता देतो, माणसाला नवा अर्थ बहाल करतो। सुर्व्यानी आपल्या कावितेतून ते दिले आहे ।

मराठी सहित्यविश्वाला या वर्षात जे धक्के बसत आहेत त्यातला आणखी हा एक मोठा धक्का आहे विंदा , भाल, चित्रे गेले आता सुर्व्याना निरोप देण्याची वेळ आपल्यावर आली आहे । सुर्व्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

Thursday, July 15, 2010

माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा


खैरलांजी प्रकरणात मुम्बई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल अनपेक्षित नव्हता. तो यासाठी की तो तसाच यावा असेच प्रयत्न सगळ्याच यंत्रनेने मनापासून केले त्यात ते यशस्वी झाले याचा अर्थ ते जिंकले आणि न्यायासाठी प्राणपनाने लढणारे पराभूत झाले असे नाही. कोर्टाचा निर्णय हा न्याय असतो. हे आता केव्हाचेच कालबाह्य झाले आहे. तो केवल आरोपी आणि फिर्यादीना दिलेला एक निकाल असतो.
न्याय व्यवस्था हा लोकाशाहिताला अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. माध्यम आणि विधिमंडल व् मंत्रीमंडलाची राजकारनाने काय अवस्था केली आहे. हे सगलेच जाणतात. केवल न्यायव्यवस्थेवरच समाजाचा थोडासा विश्वास होता तोही आता धुलित मिळाला आहे.या सगल्या व्यवस्थेत माणूस असतो तो जोपर्यंत निकोप असत नाही तोपर्यंत सगळी व्यवस्थाच कुचकामी आहे नेमके हेच खैरलान्जीच्या संदर्भात घडले. अत्यंत पूर्वग्रहदूषित भावनेने हे प्रकरण हतालले गेले
एका आन्धल्या पोराला, अजान पोरीला,पोराला आणि त्यांच्या आईला कृरतेने ठेचून थर मारले गेले त्यांची प्रेते नग्नावस्थेत गावाच्या बाहेर फेकली गेली. ज्यानी ते केले त्यांनाही पश्चाताप नाही यामागे केवल व्यक्तिगत कारण असू शकत नाही हे शेम्बड़े पोरही जानते पण न्यायालयाला कळत नाही.
म्हणून दलित अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्यात हे बसत नाही. यात कुठलाही विनयभंग नाही.अंध मुलाला ठार करणे यात कुठलीही क्रूरता नाही जे गेले त्यांच्याबाबत दु;ख आहेच, पण ज्यानी हे घृणित कृत्य केले त्यांच्याही बाबत आमच्या मनात दयाभाव कमी नाही. असा आमचा माणुसकीचा धर्म अफाट आहे
गवई बंधू , पोचिराम काम्बले मनोरमा काम्बले, अशा असंख्य प्रकरणाला या आमच्या माणुसकीच्या अफाट धर्माची बाधा झाली आहे खैरलान्जिला तर या बाधेने अक्षरश; गिलून टाकले आहे
न्यायचे काहीही होवो ह्या आमच्या माणुसकीच्या धर्माची अफाटता कायम राहिली पाहिजे

Wednesday, April 14, 2010

माणूस बदलतो त्या दिशेने ............


काळ आणि माणूस
यांच्या अभिन्न नात्यातून जन्माला आलेलं आयुष्य
भाजून निघालय भूतकाळाच्या तव्यावर
जातीचं अमूर्त भांडवल. धर्माचे स्थावर जंगम
मी अजूनही होत नाही नादार
या जागतिकीकरणाच्या नादात
आरत्यांचा आक्रोश, दातृत्वाचा दंभ
भंगून गेले आहे विवेकाचे खांब
भावनांचे दुखणे वाढले आहे
धरले आहे सगळ्याच महापुरुषांना वेठीस
विटंबनेच्या आगीत माणुसकीची झालेली राख
पसरली आहे आमच्या घरादारांवर
वाऱ्यावर उडते आहे जिन्दगानी
आम्ही गात आहोत ग्लोबल गाणी

बाबासाहेब! काळाने बदलली आहे कूस
तुमच्याशिवाय बोलतच नाही कुठलाही माणूस
अनटचेबल असणारे तुम्ही
झाले आहात जगाची गरज
विटाळाचा तर सोडाच बाबासाहेब
सगळेच उभे आहेत एका रांगेत तुमच्यामागे ताटकळत
तुम्हाला टाळून कोणीच पुढे जाऊ शकत नाही
तुम्हाला सोडून कोणालाच आता पूर्ण होता येत नाही
माणस बदलली कि, काळ बदलला
काहीच काळात नाही, बाबासाहेब!
पण तुम्ही झाला आहात या युगाचा कळस
काळाने झटकून टाकलाय आपला आळस
विकाराचे पक्षी गेले आहेत उडून
खोप्यावरची बुरशी गेली आहे झाडून

हे आकाश कस झाल आहे निळ- निळ स्वच्छ
काळ्या ढगांचे तांडे झाले आहेत बेपत्ता
वादळाने कोंडून ठेवले स्वताला बेमुदत
कोणीच का गात नाही माणसांच्या कल्याणाचे पावडे!
का लोंबकळत आहे लोकशाहीच्या झाडावर
आमच्याच अस्मितेचे सांगाडे ?

बाबासाहेब! समतेला झाली आहे तुमची आदत
ममतेला लागते तुमचीच मदत
बंधुत्व तुमच्या आधाराशिवाय उभाच राहू शकत नाही
तुमच्याशिवाय स्वातंत्र्याला अर्थच उरत नाही
कुठे मुरत आहे सामाजिक न्यायचे पाणी काळात नाही
उजेडच्या फांदीवर वसलेला कावळा उडता उडत नाही

अंधाराचे कलेवर खांद्यावर घेऊन
तुम्ही आलात धावत मझ्या दिशेने बेभान
तुडवत वर्णाचे पर्वत
जाळत जातीचे इमले
फेकून दिले मानगुटीवर बसलेले धर्माचे झमेले
तुम्ही शोधलाय एक नवा माणूस
तो असतो जातीधर्मवर्णाच्या पल्याड
जो काळाला खेळवतो हातावर
अस्तित्वाचा झुला बांधतो अवकाश्याच्या छतावर
तो घेतोय सूर्य उशाला
आकाशाची पांघरतो चादर
पृथ्वीची करतो घागर
त्याला नसते जगण्याची चिंता आणि मरणाची भीती
तो पकडत नाही बुरसटलेल्या रूढी परंपरेचा हात
पाळत नाही रीतीरिवाज
अडकत नाही संस्कृती- संस्काराच्या बंधनात
तो सापडतो तुम्हाला निरंजनेच्या काठावर
पिंपळाच्या पानावर
तो उठतो समाधीतून
मारतोय हाक वास्तवाला
तो अन्गुलीमालाला देतोय हात
अति मत्त हत्तीवर करतो मात
तुम्ही दिलाय त्याच्या हातात आमचा हात
अंधाराचे कलेवर पळून गेले रातोरात

बाबासाहेब! काळ कधीच थांबत नसतो
ताटकळत आपल्या दारावर
तो वर्तमानाला लावतो पटकन भूतकाळाचा चेहरा
भविष्याची बदलतो दिशा
माणसाला देतो नवी भाषा
विश्वाच्या गुळावर एल. पी. जी.च्या माशा
गळाला बांधलेला ग्याट चा घन्टा तोडायचा कसा
हरेक माणूस त्यांच्या गळाचा मासा
समाजवाद पडलाय घोरत भांडवलदाराच्या दारात
साम्यवादाने तानल्याय तंगड्या आपल्याच घरात
साम्यवादानंतर भांडवलशाही
भांडवलशाहीनंतर काय?
भांडवलशाहीनंतर समाजवाद
समाजवादानंतर काय?
सगळ्याच महासत्तांना लागली आहे चिंता
या मंदीच्या काळात आपल्या अस्तित्वाची
सगळ्याचेच आता चुकले आहे गणित
त्यांनी भैवातीकाचा केला गुणाकार
माणसाची केली बाजाबाकी
मूल्यांचा केला भागाकार
सगळ्यांच्याच हाती उरले एक शून्य
सगळेच स्वनाम धन्य!
शोधत आहेत आपले अस्तित्व
बाबासाहेब! तुम्ही एक पूर्ण सत्य
तुम्ही बांधली आमच्ची गाठ अनित्याशी
आम्ही धरली आहे तुमच्या तत्वाची कास
आता माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास
माणूस बदलतो त्या दिशेने आमचा प्रवास

सतेश्वर मोरे

Friday, April 9, 2010

आंबेडकरी कार्यकर्ता संवाद परिषद् वर्धा

हा संवाद होणे गजेचे आहे. पण आपण तयार आहोत काय ? आपल्याकडे उत्तरच नाही! कार्यकर्त्ता हा समाजाच्या गतीची नाड़ी आहेतो आहे म्हणूनच समाज समाज म्हणून जिवंत आहे पण त्याच्या जगण्याचे काय? याचा आपण कधीच गम्भिर्याने विचार करीत नाही वर्धेत हा विचार झाला। वर्धेकरंचे अभिनन्दन !

माई रमाईचा पुतला आणि मी




गेल्या अप्रैल महिन्यातल्या चार तारखेला मी महाराष्ट्राचे समाज कल्याण संचालक म़ा. इ. झेड खोब्रागडे यांच्या जन्मगावी सवारी (बिड़कर) जि. चंद्रपुर येथे माई रमाई च्या प्रतिकृतिच्या अनावरनाला आणि खोब्रागडे दाम्पत्याच्या सत्कार सोहाल्याचा निमित्ताने या सोहाल्याचा अध्यक्ष म्हणून उपस्थित होतो.याचा मला आनंद यासाठी झाला की महाराष्ट्रात मी कुठेच रमाई ची प्रतिकृति पाहिली नाही पहिल्यांदा महाराष्ट्रात माई च्या प्रतिक्रुतिचे अनावरण होते आणि मी त्या समारंभाचा अध्यक्ष असतो दुसरे असे की मुलाचे कौतुक एखाद्या गावाने करणे हे जेवढे कौतुकास्पद आहे त्याहीपेक्षा आपल्या गावाच्या सुनेचा सत्कार जेव्हा एखादे गाव करते ते गाव आदर्श आहे असे मला वाटते या अर्थाने आयुष्यमती खोब्रागडे ताईचा सत्कार करणारे सावरी (बिड़कर) हे गाव आदर्श गाव आहे. महाराष्ट्राच्या आदर्श ग्राम योजनेत हा निकष समाविष्ट करावा आणि सावरीला आदर्श ग्राम पुरस्कार द्यावा अस मी म्हणालो याप्रसंगी इ. झेड आणि खोब्रागडे ताई नि जे विचार व्यक्त केले ते प्रेरणादायक आहेत हां माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्यंत अविस्मर्णीय समारोह आहे अशोक बुरबुरे यांच्या उपस्थितिने तर दुधात साखरच पडली