Monday, October 4, 2010

मी त्या माणसाच्या शोधात आहे!



माणसाचं मोठेपण कशात असते? त्याने स्वीकारलेला तत्त्वाप्रती असलेल्या प्रामाणिक निष्ठेत? की त्याने केलेल्या तडजोडीत? मुळात हे प्रश्न तेव्हाच पुढे येतात, जेव्हा एखादा माणूस आपली एखाद्या तत्त्वाप्रती आपली बांधिलकी जाहीर करतो. ज्यांचे या बांधिलकीशी काहीही देणे घेणे नसते त्यांच्या संदर्भात असले प्रश्न उभे होत नाहीत. जे लोक बांधिलकीशी आपले नाते सांगतात त्यांना या प्रश्नांना टाळून पुढे जाताच येत नाही. पद, पैसा आणि पुरस्कार याने माणूस मोठा होत नाही. हे वास्तव प्रज्ञावत माणूस जाणतो म्हणूनच तो यापेक्षा आपल्या निष्ठेला अधिक महत्त्व देतो नुकतेच आंबेडकरी अर्थतज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला आणि ह्या सगळ्या प्रश्नांना रान मोकळे झाले.
मुळात ज्या समाजवास्तवात डॉ मुणगेकरांनी स्वताला उभारले त्या समाजवास्तवात ज्या परिवर्तनाच्या चळवळी झाल्यात त्यातल्या निष्टावंत गणल्या जाणाऱ्यां एका चळवळीचे डॉ . मुणगेकर सक्रीय कार्यकर्ते होते. ही चळवळ कॉंग्रेस विरोधी होती. त्याही पुढे जावून आंबेडकरी अर्थतज्ञ म्हणून ज्याची संबंध जगभर ख्याती आहे त्याना केवळ आपले राज्यसभा सदस्यत्व कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेसला आपल्या विश्वासाचा दाखला देण्यासाठी पक्ष प्रवेशासारखा निर्णय घ्यावा लागला. हा कॉंग्रेसने त्यांच्यावर दाखवलेला अविश्वास असेलही कदाचित पण यासाठी त्याना त्यांच्या वैचारिक निष्ठेचे बलिदान देण्याची का गरज वाटावी? हाच प्रश्न पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्याना पडला आहे.
ज्या सामाजिक परिप्रेक्षात वैचारिक क्षेत्र, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रापेक्षा श्रेष्ठ समजले जाते. तिथे वैचारिक क्षेत्रातली मंडळी राजकीय क्षेत्रालाच प्राधान्य द्यायला लागली तर त्यातून दोन प्रश्न निर्माण होतात. एक: ज्या वैचारिक क्षेत्रात या मंडळींचा वावर आहे त्या क्षेत्राची मौलिकता संपुष्टात आली आहे काय? आणि दुसरे असे की, या क्षेत्रात वावरणाऱ्या माणसांच्या निष्टा प्रामाणिक नाहीत काय? आज किमान या प्रश्नानाची उत्तरे समाजाला शोधावीच लागेल कारण मुणगेकर हे एकटे नाहीत यापूर्वीही असे प्रकार घडले नाहीत असे नाही. थोड्याफार फरकाने अशा घटना वैचारिक क्षेत्रातील मंडळींच्या संदर्भात घडल्या आहेत. मुणगेकर यांच्यामुळे ही घटना उजेडात आली एवढेच!
ज्यावेळी डॉ. मुणगेकर याना राष्ट्रपती नामनिर्देशित संसद सदस्यत्व बहाल कण्यात आले त्या वेळी कॉग्रेसने दाखवलेली तटस्थता आणि स्पष्टता किती तकलादू होती. हे आता अगदी थोड्याच अवधीत सिद्ध झाले आहे. पदाने अथवा पैशाने माणसे वाकवण्याची त्यांची जुनीच नीती आताही त्याच पद्धतीने सुरुच आहे. निष्ठावंत प्रतिष्ठीत माणसाना आमिषे द्यायची . आमिषांना बळी पडलेली माणस आपल्या माणसांपासून तोडायची आणि हतबल करून सोडून द्यायची. मग त्यांचा रुपवते होतो, भंडारे होतो, आठवले होतो, ही यादी आणखी वाढवता येईंल. कोणीही सर्वज्ञ नसते. पण मुणगेकारांच्या संदर्भात हे इतक्या सहज घडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.
जे घडले त्याचे काय बरे - वाईट परिणाम होईल ते काळच ठरवेल. फक्त या सबंध प्रकरणात एकच दु;खाची बाब आहे ती म्हणजे आंबेडकरी माणसांच्या संदर्भात जे गृहीत धरले जाते त्याला या प्रकरणामुळे पुष्टी मिळाली. कोणी कुठे जावे हा ज्याचा त्यांचा विचार असला तरी तो ज्या समाजच प्रतिनिधित्व करीत असतो. तो समाज त्यामुळे पुढे येतो आणि त्या समाजाचा त्या समाजातील माणसांचा कुठलाही दोष नसताना बदनाम होतो. त्या समाजाला बदनाम करण्याचा ठेका तुंम्हाला कोणी दिला? माणस मोठीच असतात, पण आसक्तीची बाधा होताच
वाकून जातात नव्हे सरपटायला लागतात. जे याच्या पलीकडे जातात त्यांच्या मोठेपनासमोर आकाशालाही वाकावे लागते. अशी आकाशाला वाकवणारी माणस ज्या समाजाकडे असतात तो समाज आकाशापेक्षाही मोठा होतो. मी त्या माणसाच्या शोधात आहे!